शनिवार, ३० जून, २०१२

६. पहिली सकाळची शाळा

आज सकाळची शाळा. सकाळी उठून लवकर तयारी करून शाळेले जाना जीवावर येते. पर एक गोष्ट चांगली आहे का शाळा लवकर संपते, मंग दिवसभर आपन मस्ती कराले एकदम आझाद ! आता पावसाळा आहे तं पीटी नाही होये, हिवाळा चालू झाला का मंग हर सनिवारी पीटी करा लागंल. पर पीटीत मज्या येते. मस्त वाटते. सकाळी नाश्ता का होता तं उपासाची खिचडी, आज आषाढी एकादशी, घरी सगळ्याइले उपास रायते तं माझ्या बी उपास घडते. ’आता क्या तुह्या एकट्यासाठी घरी सैपाक बनवाचा ?  आम्ही जो खातो तोच खा तू बी आता !’ मंग गाड्याबराबर नाड्याची यात्रा तस्सा आपला बी उपास होऊन जाते. शाळेत सकाळी सकाळी सिकाले एकदम फ़्रेश वाटते , फ़क्त तो सकाळी उठाले अना तयारी करालेच जीवावर येते बस. वरून शाळेत सनवारी चारच पिरेड. रोजच शनवार आला तं एकदम माहोल होऊन जायल. शाळेत पिरेड झाले, बीचातल्या सुटीत हमेशाच्या क्रिकेटच्या बजायी आज आमी फ़ुटबॉल खेळलो, माहोल मज्या आली, बोहोत थकते मानूस  पर बोहोत मस्ती बी होते ! आता माले वाटते का काही दिवस पोराइच्या डोक्यावर फुटबॉलचाच भूत सवार राह्यल. हा सप्पा त्या यूरो लीगचा चमत्कार हो. पोट्टॆ तं आता काही दिवस  क्रिकेट पूरा बंद करतील , नुसता फ़ुटबॉल. मंग क्रिकेटच्या म्याचेस चालू झाल्या का वापिस क्रिकेट ! घरी काही खास नाही झाला. झोपलो मस्त दुपारभर ! थोडासा गृहपाठ होता तो पुरा केलो, अना मंग कस्त्याच्या घरी जाऊन थोडीसी मस्ती. मंग वापस घरी येऊन थोडा इन्टरनेटवर बसलो. आता झोपाची तयारी.

आजचा सुविचार :-

All work and no play makes Jack a dull boy !

इंग्रजाइचे सुविचार पाहा कसे रायतेत अना आमचे धांडे सर गन्तावाले(तसा ते इंग्रजी बी सिकवत ) का सुविचार( माले तं दुर्विचारच वाटे )  सांगत, " खेलोगे , कुदोगे बनोगे खराब, पढोगे लिखोगे बनोगे नवाब ! ’  म्हनूनच आपला देस खेळाइत मागे आहे अना ऑलम्पिकात एकेका मेडलले तरसावा लागते.

शुक्रवार, २९ जून, २०१२

५. अल्लाली

तसा पाहाले गेला तं हे पोस्ट कालच याले पायजे होती. पर आमची अल्लाली ! आई म्हनते का मी जसाजसा मोठा होऊन रायलो आहो तसातसा अल्लाल बी होऊन रायलो आहो. ’तू एक नम्बरचा कोडी झाला आहेस’ असी आई म्हनत राय्ते.  कालची डायरी आज लिखत आहो. डायरीवरून आठवला , काही डायर्‍या बादमंदी पुस्तका बनून छापून आल्या.(नाइ नाइ, आपला काही तसा विचार नसे.), मी मुन्सिपाल्टीच्या लायब्ररीत वाचलो होतो  काही, जसी ते ऍन फ़्र्यान्कची डायरी ! तं त्याइचयात 'Dear Diary, Dear Kitty' असा काहीतरी कोनालेतरी उद्देशून डायरी लिवली रायते. तसा आपला विचार होता. पर आपल्याले तर सप्पा लोकाइलेच डायरी सांगावाचे आहे, मग कोना एकाले कायले उद्देसून लिवाचा ? काही फ़ारम्यालिटी नाइ पायजे. म्हनूनस्यान आपला सिद्दा लिखासीन काम आहे. हाहाहा.
हां तर काल होता सुक्करवार ! का झाला काल ? काही विसेस नाइ ! घर, शाळा,घर ! जिंदगी पुरी बांधून गेली आहे. वर्गात आता सिकवन्यात लक्ष लागुन रायते, पर ते सायन्स अना गनित इन्ग्लिश्मध्ये सिकाले बोहोतच बोअर वाटते. सिकवना  चालू झाला का झोप लागू लागते. आता इंग्लिशची एवडी आदत नसे ना भाऊ ! मराठी मिडियमातून सेमी-इंग्लिश सिद्दा जमाले मुस्किल जाते. सायन्स माया एवडा पसंदीचा विसय, पर येती लेकिन झोपच लागून जाते.  आज एक पिरेड ऑफ़ होता, मराठीचा.पर वर्गाबाहेर गेला तं बाकीच्या वर्गाइतले सरलोकं कल्ला करतेत. म्हनून आमी वर्गातच मंगाच्या बाजूले थोडी जागा रिकामी आये तं तेचीच छोट्यास्या जागेत क्रिकेट खेळला.का मज्जा आली ! पोरीइकडे बॉल जाये तं त्या बॉल देवाले भाव खात ! पर देऊनबी टाकत. मंग पोरीइनं धमकी देली का आमी सराले सांगून का तुम्ही वर्गात क्रिकेट खेळता. मंग आमी फ़ुकटचा मार बसल म्ह्नून क्रिकेट खेळना बंद केला अना मग डेस्कावरचे आपले नाव चिकनवत बसलो.  रावल्या जानुनबुजून एका ब्लेडनं डेस्कवर घासून कर्र-कर्र असा कानाले टोचनेवाला आवाज  काडू लागला. आमाले तं मजा येत होती पर पोट्ट्या एकदम परेशान ! चांगलाच बदला घेतला. असे खाली पिरेड भेटले का मस्त मस्ती करता येते, पर कोनी बदली सर नाही आले पायजे  ! तसा आमच्या शाळेत बदली सर बहोत कमी येतेत म्हनून चांगला आहे, ऑफ़ पिरेडला बोहोत मस्ती करता येते, फ़क्त बाजूनच्या वर्गाइले तरास नाही झाला म्हनजे कोनं पाह्यलंन.
 घरी आल्यावर जरा खेळाले गेलो मोहल्ल्यातले पोट्ट्याइसंगं, घरी येऊन हात-पाय-तोंड धुवून जेवन, मंग गृहपाठ. मराठीची पुस्तक वाचाले माले बोहोत आवडते तं अखीन-अखीन मराठीचे धडे वाचत बसलो. मंग ध्यानात आला का आपन डायरी नाइ लिहला, पर बोहोतच आळस आला होता अना झोप बी लागत होती तं आज लिहाचा विचार करून झोपून गेलो.

आजचा सुविचार :-

आळस हा माणसाचा शत्रू आहे. - पंडित जवाहरलाल नेहरू

या सुविचारावरून आठवला, आमच्या बर्डे सराइनं एक जोक सांगितला होता. एका लायब्ररीत महात्मा गांधी अना नेहरूचाचाचा फोटो शेजारी शेजारी ठेवला आहे. दोघाइच्या फोटोखाली दोघाइचे सुविचार ! पं. नेहरूइच्या फोटोखाली आहे, ’ आळस हा माणसाचा शत्रू आहे’ अना गांधीजींच्या फोटोखाली, ’शत्रूवर प्रेम करा’ ! हाहाहा

गुरुवार, २८ जून, २०१२

४. नेट भसकला

आजची ताजा खबर हेच. काल रात्री नेट भसकला तो आता आला. बाकी दिवसभर काही खास नाही केलो. शाळेत अजून मस्ती चालू होवाची आहे. घरी बी अभ्यास नाही , काही नाही, टीवी पाहा, थोडा काही वाचा बास. नेट नव्हता तं काही लिवता बी नाही आला. आता नेट आला आहे तं दिवस सराच्या पैले काई बी दोन शब्द लिहाचे म्हनूनस्यान लिहून टाकतो. आज झोपाले बी बहोत उशीर झाला. पप्पा रागावत आहेत. लवकर झोपाले पाइजे. नेट्ची आदत चांगली नसे. पर आता असा नेट भसकत जायल तं आमी का करून ?  आपल्या भारतात एक सर्विस धडाची देत नाही अना स्पीड पाहा तं अशीतशीच...  कई प्रगती होयल या देशाची ? चला झोपतो, पप्पा नाहीतं दोन देतील कानाखाली.


आजचा सुविचार :-

 लवकर निजे , लवकर उठे, तया ‍ ज्ञान, संपत्ती, आरोग्य भेटे   (असाच आहे नं ? घाईघाई त बराबर आठवून बी नाही रायला.)

बुधवार, २७ जून, २०१२

३. बोरिंग दिवस- पार्ट टू

आजचा दिवस बी बोरिंगच. काल रात्री काही खास नाही केलो.. जेवा, बातम्या पाहा, सिरीयली पाहा अना झोपा. आज शाळेत बी का तं तेच प्रार्थना, त्याच्याबाद पिरेड,छोटी सुटी, सुटीतला क्रिकेट, थोडासा पाऊस, पिरेड, डबा खाची सुटी, पिरेड अना घरी. काहीतरी खास होवाले पायजे जीवनात.. आज वर्गात काही जोक नाही, मस्ती नाही, खिचाखाची नाही, चिल्लमचपाटी नाही, काही नाही. बोरिंग दिवस आजचाबी.. आता स्वस्थ बसाची इच्छा नाही होये. काही ना काही खुडबूड-खुडबूड कराची इच्छा होत रायते. पैले कसा वर्गात एकदम लक्ष लागे, आजकाल मग इकडेतिकडे भिरभिरते.. माहीत नाही का आहे तं ! शायद नविन-नविन शाळा चालू झाली त्याचा असल.. माहीत होयलच काही दिवसाच्या बाद. जाऊ द्या, अखीन का लिखू ? आज एवडाच, मन काही शांत होऊन नाही रायला.

आजचा सुविचार : -

ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.

मंगळवार, २६ जून, २०१२

२. बोरिंग दिवस

     आजचा दिवस बड़ा बोरिंग होता. सकाळी उठलो, नाश्ता केलो, पेपर वाचलो, शाळेची तयारी करून जेवण करून शाळेत फुर्र.. आज सकाळी भाजी बी बोरिंग होती, कार्ल्याची.. मी खातो पर मजा येत नाही. मंग का शाळेत पोचल्यावर तेच आपला जन-गन-मन, ’इतनी शक्ती हमें दे ना दाता’.  या ’इतनी शक्ती हमें दे ना दाता’ ची एक मजा आहे. मी पाचवीत या शाळेत आलो तं काही हे प्रार्थना माहीत नवती. मोठे पोट्टे जसी म्हन्तेत तसी आपन म्हनाची. तं सब पोट्टे असीच प्रार्थना शिकतेत. तं गम्मत हे होते का, बाकी जसे म्हन्तील तसी आपन म्हनू, सही-गलत कोनाले मालूम ? मंग आमी देवाजवळ, ’अपनी करुना का ’जंतू’ बहाकर’ आपल्या मनाचा कोना पावन कराची विनंती करून टाकतो. ’नेक’ रस्त्याच्या बजाय ’एक’ रस्त्यावर चालाची इच्छा दाखवून आमी आमची एकता दाखवून देतो.हरसाल आमचे पीटीवाले पडोळे सर ’अरे मुलांनो प्रार्थना व्यवस्थित म्हणा रे’ सांगत आमची चूक दुरुस्त करतील प्रार्थनेच्या घडी. पर पोट्टे बी आदत से मजबूर ! दहा दिवस झाले नाही का वापस ’जंतू’ आणि ’एक’ ! हाहाहा.. मी आपला बरोबर प्रार्थना म्हन्तो भाऊ. पडोळे सरांनच एक गम्मत सांगितली होती पाचवीत. सामूहिक प्रार्थना सामूहिक रायतेत कावून का आपन एकट्यात म्हनाले गेलो तं आपन काही म्हनू शकू नाइ. तेच जरा सब जन जमा होऊन एका तालासूरात चालू झाले तं पूरी प्रार्थना म्हनून होते.  उदाहरन द्यासाठी सरांनी मग आमाले वर्गातच ’जन-गन-मन’ एकेका पोट्ट्याले म्हनाले लावला. कोनालेबी म्हन्ता आली नाही. अना मंग एकाखट्टे म्हनाले सांगला तं सब पोपटावानी एका सुरात ’जन-गन-मन’ चालू झाले. आहे का नाही गम्मत ?  पर तई माले बेकार वाटला. राष्ट्रगीत आपल्याले एकट्याले बी मन्ता याले पायजे असा वाटला ना मी मंग एकट्यानं ’जन-गन-मन’ म्हनाची प्रॅक्टीस केलो. आता माले एकट्याले बी जन-गन-मन म्हन्ता येते. 

   काल सब नव्या कोर्‍या पुस्तका आनला पप्पाजींनं बाजारातून. मस्त कोर्‍या नव्या पुस्तका. खोलून घेतलो , नाकाजवळ नेलो अना असा वास भरून घेतला नाकात !व्वा ! काय मस्त वास रायते कोर्‍या पुस्तकाइचा. माले तं भाऊ बोहोतच पसंद आहे. हरसाल नव्या पुस्तका आल्या का मी पैले वास नाकात भरून घेतो. मंग सालभर तो वास शरीरात अना मनात अशी ताकत , उर्जा भरून ठेवते का पुस्तक वाचाची इच्छा कायम रायते. पुस्तकाशी एकदम प्रेमच होऊन जाते. खाकी रंगाचे पुट्ठे लावून देल्ले आईनं सप्पा पुस्तकाइले. मंग मस्त इस्टीकर लावून ’सुंदर सुवाच्य अक्षरात’ (आता क्ष टाइप कराले जमा लागला) ’नाव’, ’शाळेचे नाव’, ’इयत्ता’ अना ’तुकडी’ लिहून देली.

    प्रार्थनेच्या बाद वर्गात. आज वर्गात शिकवना चालू  झाला. पर २ महिन्याच्या बाद वर्गात बसाची इच्छा नवती. राहू राहू मन बाहेर मैदानावर पळे. माझा पैला डेस्क. जास्त बाहेर ध्यान बी देता येत नवता. सरांचा लक्ष गेला का एक छडी छनान ! मंग आपला चुपचाप तिरपा डोळा करून बाहेर पायत रायलो. वहीवर काही खूड्बूड-खूडबूड बी करता येत नवती. पैला डेस्क कधीकधी बेकार वाटते. पर ज्याचा हरसाल वर्गात पैला नम्बर येते त्याले पैल्याच डेस्कावर बसा लागते ना ! मांगच्या डेस्कावर  ’अभ्यास न करणारे, बिनकामाचे, टवाळ मुले बसतात’ असे बोरकर मॅडम सांगत. बरोबरच आहे म्हना, मांगच्या डेस्कावरचे पोट्टे नुसते मस्ती करत रायतेत. तरी हा बोरिंगपना एक-दोन दिवस टिकल. मंग रोज शिकवना चालू झाला का मंग एकदम आवडीनं वर्गात लक्ष देता येल. मस्ती कराले तं छोटी -मधली सुटी आहे अना शाळेच्या बादचाबी टाइम आहे अना पूरी उमरबी आहे . हाहाहा.. अजून सब वर्गात पिरेड चालू व्हाचे होते. म्हनून पिरेड असला तरी ग्राउन्डवर पोट्टे खेळत होते . मजा होती त्याइची. आमचे तं दुसर्‍याच दिवसी सब पिरेड झाले. बोरिंग !

      शाळेतून घरी आलो, हात -पाय-तोंड धुवून नाश्ता केलो अना डायरी लिहाले बसलो. लिहाची बी इच्छा नाही. बोहोतच बोरिंग वाटून रायला आहे. पर लिहाचा आहे म्हनून लिहून टाकलो. कराले बसीन तं होयल.




आजचा सुविचार :- 


केल्याने होत आहे रे , आधी केलेचि पाहिजे - समर्थ रामदास स्वामी


( आता कालचाच सुविचार आज बी कावून असा प्रश्न मनात आला असल तुमच्या ! तं उत्तर हा का आज काही कराची इच्छा नवती आपली, पर कराचा तं आहे, म्हनून हिम्मत टिकवून ठेवाले हा सुविचार ! )



सोमवार, २५ जून, २०१२

१: श्रीगणेशा

॥ श्री॥

चला श्रीगणेशा झाला बाबा एकदाचा ! आजच पयल्यांदाच मराठीत टाइप करुन रायलो आहो तं तो वरती टायटलात ’श्री’ च्या जागी पैले ’स्त्री’ टाइप होऊन गेल्ता. मंग दुरुस्त केलो तं सही, पर दिमाकात खयाल येऊन गेला का , ’श्री’ म्हन्जे ’लक्ष्मी’( ’क्ष्म’ टाइप कराले १० मिन्टं गेल्ले, जिवाले तरास आहे गा), लक्ष्मी(पैलेचाच कॉपी-पेस्ट केलो, हाहाहा) आहे स्त्री ! म्हनुनसन्यानीच स्त्रीले लक्ष्मी म्हन्तंत(’स्त्री ही लक्ष्मीचे रूप असते’ असा बोरकर मॅडमनं वर्गात सांगतला होता. ), तं स्त्री = श्री ! म्हन्जे ’श्री’ लिवा का ’स्त्री’ लिवा, काही फरक पडाले नाइ पाइजे. पर म्हनलो बाप्पा आपन ’स्त्रीगणेशा’ लिवला तं लोकं बोम्बलतील, कायले फ़ुकटच्या इचापतीत पडावा.  तर अशी आहे श्रीगणेशाची कथा अना तुमाले वाटते मज्याक !
     नवा परेग्राफ़ सुरू करतो आता ! ( ’परिच्छेदात लिहायची सवय करा रे मुलांन्नो’ असे पडोळेसर हमेशा सांगत पाचवीत.) ( हमेशा नावाचा गाव बी आहे आमच्या गावाजवळ. जित्या फुंडे त्या गावाचा आहे, त्याच्या नाकात हमेशा सेंबूड राह्ये, तं मले वाटे का हमेशाच्या लोकाइच्या नाकात हमेशा सेंबूड रायत असलं म्हनून गावाचा नाव हमेशा असलं !)   तं मी का सांगत होतो, आजच आमची शाळा चालू झाली. तशी २४ जूनले होते, पर २४ जूनले आला इतवार, म्हनुनसन्यानी आज २५ जूनले चालू झाली. आता आम्ही आठवीत गेलो मज्याकमज्याक में ! आजवरी पुर्रा मराठी मिडियम होता, आता सेमी-इंग्लिश आला. विज्ञान(हाबी टाइप कराले १० मिन्टे गेले, मंग गुगल करून कॉपी-पेस्ट मारलो. ’ ज्ञा’ जमूनच नवता रायला. हाहाहा), गणित अना इंग्लिश इंग्लिशमध्ये, बाकी सब मराठीत. पोट्ट्याइत ३-४ नवे चेहरे दिसले. मराठी-हिंदीचे  सर तेच होते, बाकी नविन आले. आता कसे आहेत देवजाने बाप्पा. बाकी आज काही नवा कोनं शिकवला नाही.  तसाबी बहोतसार्‍या पोराइजवळ पुस्तकाच नवत्या. सप्पा पिरियडले ओरखीपारखीच चाल्ल्या.  त्या पोट्ट्य़ाइसोबत बोलाचा होता पर त्याइचा पैला दिवस तं ते घाबरून मंगाच्या बेंचवर बसून रायले. बसा भाऊ , आमाले का ! आपन तं पैला बेंच कधी नाही सोडाचा !  ते उगेमुगेच होते तं ’ तुम भी खुल जाओगे दो-चार मुलाक़ातों में’ असा ग़ालिब का कोनाचा तरी शेर आहे तं तो हिंदीचे गुप्तासर बोल्ले आज. वहीत पूरा नोट कराले गेलो तं वही उघडल्यावर ना पेनाचा टोकर काढल्यावर एवढाच लक्षात राहिला !  सराइले विचारा लागंल कधीतरी. 
 नवा वर्ग होता, तं आमी जल्दी-जल्दी आमचे औजार काढले कंपासबाक्सातून अना आपापल्या डेस्कावर आपापला नाव खोदून टाकला. पुर्‍या वर्गात कर्र-कर्र-कर्र...
 इंग्लिशचे निखाडेसर होते, मस्त वाटले. बहोत जुने आहेत, आता रिटायर होतील दोन-तीन सालात असा वाटला. सप्पा पोराइचा इंग्लिशात इंट्रो घेतला. आपन तं भाऊ फाडफाड देऊन टाकला. सायन्सचे सर बी मस्तच होते. मले पैल्यापासूनच ओळखत होते तं मस्त वाटला ते शिकवतील म्हनून. गन्ताचे सर थोडे कडक वाटले.चांगलीच पदाई होइल असा वाटला. इतिहासाचे नविन होते कोनीतरी, माझ्या मित्राच्या मोहल्ल्यातलेच होत असा तो सांगत होता, आमचीवाली पैलीच ब्याच त्याइची , मज्जा येल असा वाटते. बाकी मराठीले आपले जुनेच सर होते. आता मोठे झाल्या , जरा जिम्मेदारीनं वागा, चांगला अभ्यास करा, दहावीचा पाया आताच बन्ते वगैरे हमेशासारखा ग्यान या वर्षीबी वाटून झाला.
  मंग बाकी दिवसभर सुट्ट्यात का का केला, कोनं किती मस्ती केली हेच रंग मारून सांगत रायले सबजन. चांगला वाटला आज, शाळेचा पैला दिवस म्हन्जे मज्जा रायते. दोन महिन्याइच्या बाद शाळेत जाले बहोत चांगला वाटते.सब जुने दोस्त भेटले, अतकरीच्या वडलाइची बदली झाली तं तो गेला, बहोत चांगला दोस्त होता तो, त्याचे बहोत याद करून रायले होते सब.  मन्या, रावल्या, कस्त्या आपले हमेशाचे गडी होतेच, आमची बोलाची गाडी जे सुटली तं संपाचा नावच नवती घेत. आज क्रिकेट बी खेळलो ग्राउंडवर. 
  घरी आलो तं जसा आपला संकल्प होता का शाळा चालू झाली का ब्लॉग लिहाचा तो पुरा कराले घेतलो. मांगच्या वर्साले घरी नेट आला तई ब्लॉगची जानकारी भेटली. आपल्याने डायरी लिखाची होतीच तं ऑनलाइनच काउन नाही लिखाची म्हनुनस्यान मंग हा लिखाले घेतलो. आता रोजच शाळेतून आल्यावर काही तरी लिखाचा विचार तं आहे, पर आता पाहाचा आहे का कितीक निभाउन होते तं. ’आगे आगे देखिये होता हैं क्या ? ’ असा कोन्त्यातरी पिक्चरात डॉयलाग आयकलो होतो तसा काहीतरी. टायटल का देऊ विचार केलो तं वाटला का जादाचा सोचाचा नाही , डायरीच आहे तं तसाच नाव द्याचा. मंग कोन्त्या भासेत लिखाचा तं ठरला का आपन डायरीच लिखून रायलो तं जसी आपन घरीदारीसेजारी बोल्तो तसीच वापराची, आपली जसी बोल्तो तसी झाडीबोली. तसाबी मी पाह्यलो का मराठीत ब्लॉग लगीत अस्ले तरी झाडीबोलीवाल्या मराठीत एकबी नसे, मंग आपला असला तं एकदम बेस हौन जायेल.
आजच्याले  एवढा बोहोत झाला, हात दुखाले लागले, आदत नसे नं गा भाऊ ! आदत करा लागल. त्यासाठी रोजच लिखा लागल.

आजचा सुविचार( ’रोज डायरीत  एक सुविचार लिहायला पाहिजे’ असे आज मराठीच्या बर्डेसरांनी सांगितले) :-

 ’केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे’ - समर्थ रामदास स्वामी