सोमवार, २५ जून, २०१२

१: श्रीगणेशा

॥ श्री॥

चला श्रीगणेशा झाला बाबा एकदाचा ! आजच पयल्यांदाच मराठीत टाइप करुन रायलो आहो तं तो वरती टायटलात ’श्री’ च्या जागी पैले ’स्त्री’ टाइप होऊन गेल्ता. मंग दुरुस्त केलो तं सही, पर दिमाकात खयाल येऊन गेला का , ’श्री’ म्हन्जे ’लक्ष्मी’( ’क्ष्म’ टाइप कराले १० मिन्टं गेल्ले, जिवाले तरास आहे गा), लक्ष्मी(पैलेचाच कॉपी-पेस्ट केलो, हाहाहा) आहे स्त्री ! म्हनुनसन्यानीच स्त्रीले लक्ष्मी म्हन्तंत(’स्त्री ही लक्ष्मीचे रूप असते’ असा बोरकर मॅडमनं वर्गात सांगतला होता. ), तं स्त्री = श्री ! म्हन्जे ’श्री’ लिवा का ’स्त्री’ लिवा, काही फरक पडाले नाइ पाइजे. पर म्हनलो बाप्पा आपन ’स्त्रीगणेशा’ लिवला तं लोकं बोम्बलतील, कायले फ़ुकटच्या इचापतीत पडावा.  तर अशी आहे श्रीगणेशाची कथा अना तुमाले वाटते मज्याक !
     नवा परेग्राफ़ सुरू करतो आता ! ( ’परिच्छेदात लिहायची सवय करा रे मुलांन्नो’ असे पडोळेसर हमेशा सांगत पाचवीत.) ( हमेशा नावाचा गाव बी आहे आमच्या गावाजवळ. जित्या फुंडे त्या गावाचा आहे, त्याच्या नाकात हमेशा सेंबूड राह्ये, तं मले वाटे का हमेशाच्या लोकाइच्या नाकात हमेशा सेंबूड रायत असलं म्हनून गावाचा नाव हमेशा असलं !)   तं मी का सांगत होतो, आजच आमची शाळा चालू झाली. तशी २४ जूनले होते, पर २४ जूनले आला इतवार, म्हनुनसन्यानी आज २५ जूनले चालू झाली. आता आम्ही आठवीत गेलो मज्याकमज्याक में ! आजवरी पुर्रा मराठी मिडियम होता, आता सेमी-इंग्लिश आला. विज्ञान(हाबी टाइप कराले १० मिन्टे गेले, मंग गुगल करून कॉपी-पेस्ट मारलो. ’ ज्ञा’ जमूनच नवता रायला. हाहाहा), गणित अना इंग्लिश इंग्लिशमध्ये, बाकी सब मराठीत. पोट्ट्याइत ३-४ नवे चेहरे दिसले. मराठी-हिंदीचे  सर तेच होते, बाकी नविन आले. आता कसे आहेत देवजाने बाप्पा. बाकी आज काही नवा कोनं शिकवला नाही.  तसाबी बहोतसार्‍या पोराइजवळ पुस्तकाच नवत्या. सप्पा पिरियडले ओरखीपारखीच चाल्ल्या.  त्या पोट्ट्य़ाइसोबत बोलाचा होता पर त्याइचा पैला दिवस तं ते घाबरून मंगाच्या बेंचवर बसून रायले. बसा भाऊ , आमाले का ! आपन तं पैला बेंच कधी नाही सोडाचा !  ते उगेमुगेच होते तं ’ तुम भी खुल जाओगे दो-चार मुलाक़ातों में’ असा ग़ालिब का कोनाचा तरी शेर आहे तं तो हिंदीचे गुप्तासर बोल्ले आज. वहीत पूरा नोट कराले गेलो तं वही उघडल्यावर ना पेनाचा टोकर काढल्यावर एवढाच लक्षात राहिला !  सराइले विचारा लागंल कधीतरी. 
 नवा वर्ग होता, तं आमी जल्दी-जल्दी आमचे औजार काढले कंपासबाक्सातून अना आपापल्या डेस्कावर आपापला नाव खोदून टाकला. पुर्‍या वर्गात कर्र-कर्र-कर्र...
 इंग्लिशचे निखाडेसर होते, मस्त वाटले. बहोत जुने आहेत, आता रिटायर होतील दोन-तीन सालात असा वाटला. सप्पा पोराइचा इंग्लिशात इंट्रो घेतला. आपन तं भाऊ फाडफाड देऊन टाकला. सायन्सचे सर बी मस्तच होते. मले पैल्यापासूनच ओळखत होते तं मस्त वाटला ते शिकवतील म्हनून. गन्ताचे सर थोडे कडक वाटले.चांगलीच पदाई होइल असा वाटला. इतिहासाचे नविन होते कोनीतरी, माझ्या मित्राच्या मोहल्ल्यातलेच होत असा तो सांगत होता, आमचीवाली पैलीच ब्याच त्याइची , मज्जा येल असा वाटते. बाकी मराठीले आपले जुनेच सर होते. आता मोठे झाल्या , जरा जिम्मेदारीनं वागा, चांगला अभ्यास करा, दहावीचा पाया आताच बन्ते वगैरे हमेशासारखा ग्यान या वर्षीबी वाटून झाला.
  मंग बाकी दिवसभर सुट्ट्यात का का केला, कोनं किती मस्ती केली हेच रंग मारून सांगत रायले सबजन. चांगला वाटला आज, शाळेचा पैला दिवस म्हन्जे मज्जा रायते. दोन महिन्याइच्या बाद शाळेत जाले बहोत चांगला वाटते.सब जुने दोस्त भेटले, अतकरीच्या वडलाइची बदली झाली तं तो गेला, बहोत चांगला दोस्त होता तो, त्याचे बहोत याद करून रायले होते सब.  मन्या, रावल्या, कस्त्या आपले हमेशाचे गडी होतेच, आमची बोलाची गाडी जे सुटली तं संपाचा नावच नवती घेत. आज क्रिकेट बी खेळलो ग्राउंडवर. 
  घरी आलो तं जसा आपला संकल्प होता का शाळा चालू झाली का ब्लॉग लिहाचा तो पुरा कराले घेतलो. मांगच्या वर्साले घरी नेट आला तई ब्लॉगची जानकारी भेटली. आपल्याने डायरी लिखाची होतीच तं ऑनलाइनच काउन नाही लिखाची म्हनुनस्यान मंग हा लिखाले घेतलो. आता रोजच शाळेतून आल्यावर काही तरी लिखाचा विचार तं आहे, पर आता पाहाचा आहे का कितीक निभाउन होते तं. ’आगे आगे देखिये होता हैं क्या ? ’ असा कोन्त्यातरी पिक्चरात डॉयलाग आयकलो होतो तसा काहीतरी. टायटल का देऊ विचार केलो तं वाटला का जादाचा सोचाचा नाही , डायरीच आहे तं तसाच नाव द्याचा. मंग कोन्त्या भासेत लिखाचा तं ठरला का आपन डायरीच लिखून रायलो तं जसी आपन घरीदारीसेजारी बोल्तो तसीच वापराची, आपली जसी बोल्तो तसी झाडीबोली. तसाबी मी पाह्यलो का मराठीत ब्लॉग लगीत अस्ले तरी झाडीबोलीवाल्या मराठीत एकबी नसे, मंग आपला असला तं एकदम बेस हौन जायेल.
आजच्याले  एवढा बोहोत झाला, हात दुखाले लागले, आदत नसे नं गा भाऊ ! आदत करा लागल. त्यासाठी रोजच लिखा लागल.

आजचा सुविचार( ’रोज डायरीत  एक सुविचार लिहायला पाहिजे’ असे आज मराठीच्या बर्डेसरांनी सांगितले) :-

 ’केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे’ - समर्थ रामदास स्वामी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा