शुक्रवार, २९ जून, २०१२

५. अल्लाली

तसा पाहाले गेला तं हे पोस्ट कालच याले पायजे होती. पर आमची अल्लाली ! आई म्हनते का मी जसाजसा मोठा होऊन रायलो आहो तसातसा अल्लाल बी होऊन रायलो आहो. ’तू एक नम्बरचा कोडी झाला आहेस’ असी आई म्हनत राय्ते.  कालची डायरी आज लिखत आहो. डायरीवरून आठवला , काही डायर्‍या बादमंदी पुस्तका बनून छापून आल्या.(नाइ नाइ, आपला काही तसा विचार नसे.), मी मुन्सिपाल्टीच्या लायब्ररीत वाचलो होतो  काही, जसी ते ऍन फ़्र्यान्कची डायरी ! तं त्याइचयात 'Dear Diary, Dear Kitty' असा काहीतरी कोनालेतरी उद्देशून डायरी लिवली रायते. तसा आपला विचार होता. पर आपल्याले तर सप्पा लोकाइलेच डायरी सांगावाचे आहे, मग कोना एकाले कायले उद्देसून लिवाचा ? काही फ़ारम्यालिटी नाइ पायजे. म्हनूनस्यान आपला सिद्दा लिखासीन काम आहे. हाहाहा.
हां तर काल होता सुक्करवार ! का झाला काल ? काही विसेस नाइ ! घर, शाळा,घर ! जिंदगी पुरी बांधून गेली आहे. वर्गात आता सिकवन्यात लक्ष लागुन रायते, पर ते सायन्स अना गनित इन्ग्लिश्मध्ये सिकाले बोहोतच बोअर वाटते. सिकवना  चालू झाला का झोप लागू लागते. आता इंग्लिशची एवडी आदत नसे ना भाऊ ! मराठी मिडियमातून सेमी-इंग्लिश सिद्दा जमाले मुस्किल जाते. सायन्स माया एवडा पसंदीचा विसय, पर येती लेकिन झोपच लागून जाते.  आज एक पिरेड ऑफ़ होता, मराठीचा.पर वर्गाबाहेर गेला तं बाकीच्या वर्गाइतले सरलोकं कल्ला करतेत. म्हनून आमी वर्गातच मंगाच्या बाजूले थोडी जागा रिकामी आये तं तेचीच छोट्यास्या जागेत क्रिकेट खेळला.का मज्जा आली ! पोरीइकडे बॉल जाये तं त्या बॉल देवाले भाव खात ! पर देऊनबी टाकत. मंग पोरीइनं धमकी देली का आमी सराले सांगून का तुम्ही वर्गात क्रिकेट खेळता. मंग आमी फ़ुकटचा मार बसल म्ह्नून क्रिकेट खेळना बंद केला अना मग डेस्कावरचे आपले नाव चिकनवत बसलो.  रावल्या जानुनबुजून एका ब्लेडनं डेस्कवर घासून कर्र-कर्र असा कानाले टोचनेवाला आवाज  काडू लागला. आमाले तं मजा येत होती पर पोट्ट्या एकदम परेशान ! चांगलाच बदला घेतला. असे खाली पिरेड भेटले का मस्त मस्ती करता येते, पर कोनी बदली सर नाही आले पायजे  ! तसा आमच्या शाळेत बदली सर बहोत कमी येतेत म्हनून चांगला आहे, ऑफ़ पिरेडला बोहोत मस्ती करता येते, फ़क्त बाजूनच्या वर्गाइले तरास नाही झाला म्हनजे कोनं पाह्यलंन.
 घरी आल्यावर जरा खेळाले गेलो मोहल्ल्यातले पोट्ट्याइसंगं, घरी येऊन हात-पाय-तोंड धुवून जेवन, मंग गृहपाठ. मराठीची पुस्तक वाचाले माले बोहोत आवडते तं अखीन-अखीन मराठीचे धडे वाचत बसलो. मंग ध्यानात आला का आपन डायरी नाइ लिहला, पर बोहोतच आळस आला होता अना झोप बी लागत होती तं आज लिहाचा विचार करून झोपून गेलो.

आजचा सुविचार :-

आळस हा माणसाचा शत्रू आहे. - पंडित जवाहरलाल नेहरू

या सुविचारावरून आठवला, आमच्या बर्डे सराइनं एक जोक सांगितला होता. एका लायब्ररीत महात्मा गांधी अना नेहरूचाचाचा फोटो शेजारी शेजारी ठेवला आहे. दोघाइच्या फोटोखाली दोघाइचे सुविचार ! पं. नेहरूइच्या फोटोखाली आहे, ’ आळस हा माणसाचा शत्रू आहे’ अना गांधीजींच्या फोटोखाली, ’शत्रूवर प्रेम करा’ ! हाहाहा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा