मंगळवार, २६ जून, २०१२

२. बोरिंग दिवस

     आजचा दिवस बड़ा बोरिंग होता. सकाळी उठलो, नाश्ता केलो, पेपर वाचलो, शाळेची तयारी करून जेवण करून शाळेत फुर्र.. आज सकाळी भाजी बी बोरिंग होती, कार्ल्याची.. मी खातो पर मजा येत नाही. मंग का शाळेत पोचल्यावर तेच आपला जन-गन-मन, ’इतनी शक्ती हमें दे ना दाता’.  या ’इतनी शक्ती हमें दे ना दाता’ ची एक मजा आहे. मी पाचवीत या शाळेत आलो तं काही हे प्रार्थना माहीत नवती. मोठे पोट्टे जसी म्हन्तेत तसी आपन म्हनाची. तं सब पोट्टे असीच प्रार्थना शिकतेत. तं गम्मत हे होते का, बाकी जसे म्हन्तील तसी आपन म्हनू, सही-गलत कोनाले मालूम ? मंग आमी देवाजवळ, ’अपनी करुना का ’जंतू’ बहाकर’ आपल्या मनाचा कोना पावन कराची विनंती करून टाकतो. ’नेक’ रस्त्याच्या बजाय ’एक’ रस्त्यावर चालाची इच्छा दाखवून आमी आमची एकता दाखवून देतो.हरसाल आमचे पीटीवाले पडोळे सर ’अरे मुलांनो प्रार्थना व्यवस्थित म्हणा रे’ सांगत आमची चूक दुरुस्त करतील प्रार्थनेच्या घडी. पर पोट्टे बी आदत से मजबूर ! दहा दिवस झाले नाही का वापस ’जंतू’ आणि ’एक’ ! हाहाहा.. मी आपला बरोबर प्रार्थना म्हन्तो भाऊ. पडोळे सरांनच एक गम्मत सांगितली होती पाचवीत. सामूहिक प्रार्थना सामूहिक रायतेत कावून का आपन एकट्यात म्हनाले गेलो तं आपन काही म्हनू शकू नाइ. तेच जरा सब जन जमा होऊन एका तालासूरात चालू झाले तं पूरी प्रार्थना म्हनून होते.  उदाहरन द्यासाठी सरांनी मग आमाले वर्गातच ’जन-गन-मन’ एकेका पोट्ट्याले म्हनाले लावला. कोनालेबी म्हन्ता आली नाही. अना मंग एकाखट्टे म्हनाले सांगला तं सब पोपटावानी एका सुरात ’जन-गन-मन’ चालू झाले. आहे का नाही गम्मत ?  पर तई माले बेकार वाटला. राष्ट्रगीत आपल्याले एकट्याले बी मन्ता याले पायजे असा वाटला ना मी मंग एकट्यानं ’जन-गन-मन’ म्हनाची प्रॅक्टीस केलो. आता माले एकट्याले बी जन-गन-मन म्हन्ता येते. 

   काल सब नव्या कोर्‍या पुस्तका आनला पप्पाजींनं बाजारातून. मस्त कोर्‍या नव्या पुस्तका. खोलून घेतलो , नाकाजवळ नेलो अना असा वास भरून घेतला नाकात !व्वा ! काय मस्त वास रायते कोर्‍या पुस्तकाइचा. माले तं भाऊ बोहोतच पसंद आहे. हरसाल नव्या पुस्तका आल्या का मी पैले वास नाकात भरून घेतो. मंग सालभर तो वास शरीरात अना मनात अशी ताकत , उर्जा भरून ठेवते का पुस्तक वाचाची इच्छा कायम रायते. पुस्तकाशी एकदम प्रेमच होऊन जाते. खाकी रंगाचे पुट्ठे लावून देल्ले आईनं सप्पा पुस्तकाइले. मंग मस्त इस्टीकर लावून ’सुंदर सुवाच्य अक्षरात’ (आता क्ष टाइप कराले जमा लागला) ’नाव’, ’शाळेचे नाव’, ’इयत्ता’ अना ’तुकडी’ लिहून देली.

    प्रार्थनेच्या बाद वर्गात. आज वर्गात शिकवना चालू  झाला. पर २ महिन्याच्या बाद वर्गात बसाची इच्छा नवती. राहू राहू मन बाहेर मैदानावर पळे. माझा पैला डेस्क. जास्त बाहेर ध्यान बी देता येत नवता. सरांचा लक्ष गेला का एक छडी छनान ! मंग आपला चुपचाप तिरपा डोळा करून बाहेर पायत रायलो. वहीवर काही खूड्बूड-खूडबूड बी करता येत नवती. पैला डेस्क कधीकधी बेकार वाटते. पर ज्याचा हरसाल वर्गात पैला नम्बर येते त्याले पैल्याच डेस्कावर बसा लागते ना ! मांगच्या डेस्कावर  ’अभ्यास न करणारे, बिनकामाचे, टवाळ मुले बसतात’ असे बोरकर मॅडम सांगत. बरोबरच आहे म्हना, मांगच्या डेस्कावरचे पोट्टे नुसते मस्ती करत रायतेत. तरी हा बोरिंगपना एक-दोन दिवस टिकल. मंग रोज शिकवना चालू झाला का मंग एकदम आवडीनं वर्गात लक्ष देता येल. मस्ती कराले तं छोटी -मधली सुटी आहे अना शाळेच्या बादचाबी टाइम आहे अना पूरी उमरबी आहे . हाहाहा.. अजून सब वर्गात पिरेड चालू व्हाचे होते. म्हनून पिरेड असला तरी ग्राउन्डवर पोट्टे खेळत होते . मजा होती त्याइची. आमचे तं दुसर्‍याच दिवसी सब पिरेड झाले. बोरिंग !

      शाळेतून घरी आलो, हात -पाय-तोंड धुवून नाश्ता केलो अना डायरी लिहाले बसलो. लिहाची बी इच्छा नाही. बोहोतच बोरिंग वाटून रायला आहे. पर लिहाचा आहे म्हनून लिहून टाकलो. कराले बसीन तं होयल.




आजचा सुविचार :- 


केल्याने होत आहे रे , आधी केलेचि पाहिजे - समर्थ रामदास स्वामी


( आता कालचाच सुविचार आज बी कावून असा प्रश्न मनात आला असल तुमच्या ! तं उत्तर हा का आज काही कराची इच्छा नवती आपली, पर कराचा तं आहे, म्हनून हिम्मत टिकवून ठेवाले हा सुविचार ! )



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा